निसर्गरम्य कोकण किनारपट्टी | पालघर

मथाणे गावात आपले मनःपूर्वक स्वागत

Welcome to Mathane Village

मथाणे गांव में आपका स्वागत है

"समुद्रकिनारा, नारळी-सुपारीच्या बागा, श्री दुर्गा भवानीची कृपा, समृद्ध वाडवळ-सोमवंशीय संस्कृती आणि सुपीक शेतीचा अलौकिक संगम."

📍 असा हा आमचा मथाणे गाव

मुंबईपासून अवघ्या १०० किमी अंतरावर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर निसर्गाचा वरदहस्त लाभलेले छोटेसे पण टुमदार गाव म्हणजे 'मथाणे'. गावाच्या उत्तरेस पसरणी, दक्षिणेस एडवण, पूर्वेस भादवे आणि पश्चिमेस विशाल अरबी समुद्र पसरलेला आहे. जवळचे रेल्वे स्टेशन सफाळे (१६ किमी) आहे.

🌱 १. शेती, बागायती आणि मेहनत

मथाणे गावातील बहुसंख्यांक वस्ती वाडवळ व सोमवंशीय क्षत्रिय पाचकळशी समाजाची असून शेती आणि बागायती हाच मुख्य उपजीविकेचा साधन आहे. पावसाळ्यात शेतकरी थांबत नाहीत, तर उन्हाळ्यातही शेतात घाम गाळून भाजीपाल्याचे भरघोस उत्पन्न घेतात.

भातशेती व हंगामी पिके

पावसाळ्यात सुपीक जमिनीत भातशेती (तांदूळ) केली जाते. पावसाळ्यानंतर उन्हाळ्यात कारली, मिरची, दुधी, पडवळ अशा विविध भाजीपाल्याचे पीक घेतले जाते.

नारळी-सुपारी व पानांच्या बागा

ताडा-माडाची झाडे आणि नारळ, केळी, सुपारी तसेच प्रसिद्ध 'पानवेलींच्या बागा' (वड्याची बागा) यामुळे संपूर्ण गाव सदैव हिरवागार दिसतो.

बाजारपेठ व व्यापार

येथून दररोज ताजा भाजीपाला व दुग्धजन्य पदार्थ सफाळे आणि मुंबईच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठवले जातात.

🏖️ २. पर्यावरण, समुद्रकिनारा व निसर्गसौंदर्य

शांत व स्वच्छ समुद्रकिनारा

मथाणे गावाचा समुद्रकिनारा अत्यंत स्वच्छ, विस्तीर्ण आणि प्रदूषणमुक्त आहे. संध्याकाळच्या वेळी होणारा नयनरम्य सूर्यास्त पाहण्यासाठी निसर्गप्रेमी येथे गर्दी करतात.

तीन मोठे तलाव व धरण

गावाच्या सौंदर्यात आणि उत्पन्नात भर घालणारे तीन मोठे तलाव आहेत. पावसाळ्यात कमळांनी तलाव फुलून जातात आणि तलावात माशांची पैदासही केली जाते. जवळच निसर्गरम्य मथाणे धरण आहे.

🛕 ३. गावातील प्राचीन मंदिरे व जागृत दैवते

मथाणे गावाला अध्यात्म आणि धार्मिक परंपरेचा मोठा वारसा आहे. गावातील चारही चिरंजीव दैवते अत्यंत महत्त्वाची मानली जातात.

ग्रामदेवता

श्री दुर्गा भवानी माता मंदिर

गावाची कुलस्वामिनी! पूर्वी घुमटाकार असलेल्या या मंदिरात शिळेच्या मूर्ती होत्या. नंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्लॅबचे नवीन मंदिर उभारले आणि पंचधातूच्या नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना केली.

रक्षक दैवत

डोकऱ्यादेव मंदिर

चौधरी कुटुंबीयांच्या वाडीत असलेले हे रक्षक स्थान. जुनी माणसे सांगतात, रात्रीच्या वेळी पांढऱ्या शुभ्र घोड्यावर पांढरे वस्त्र परिधान करून डोकऱ्यादेव गावाचा पहारा करत असत.

स्वयंभू

स्वयंभू श्री शंकर मंदिर

येथील शंकराची पिंड स्वयंभू व खाली होती. पुढे सखाराम चौधरी अण्णा यांनी जिर्णोद्धार करून सभागृहासह नवीन मंदिर उभारले. येथे धार्मिक व उत्तरकार्याचे विधी पार पडतात.

चमत्कारी स्थान

मायगावड देव (समुद्रकिनारा)

चाफावाडीच्या मागे किनाऱ्यावरील हा दगड. रात्री येणाऱ्या प्रवाशाने प्रार्थना केल्यास देव सोबती म्हणून खाडीपर्यंत सोबत येत असे! महेश पाटील व सहकाऱ्यांनी याचा जिर्णोद्धार केला.

👰🤵 लग्नाची विशेष पारंपरिक प्रथा:

मथाणे गावात कोणत्याही मुलाचे किंवा मुलीचे लग्न ठरल्यानंतर मुहूर्ताच्या वेळी प्रथम श्री दुर्गा भवानी माता मंदिरात जाऊन पूजाअर्चा करून देवीची ओटी भरली जाते आणि त्यानंतर डोकऱ्या देवाकडे जाऊन यथासांग पूजा करण्याची परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते.

🏡 ४. गावातील वास्तू, जुनी घरे व संस्था

🏛️ ग्रामपंचायत व सोयी-सुविधा

पूर्वी ग्रुप ग्रामपंचायत असणाऱ्या मथाणे गावात स्वर्गीय रावजी सु. पाटील हे पहिले सरपंच होते. आता स्वतंत्र ग्रामपंचायत असून रस्ते, नळ पाणीपुरवठा, पथदिवे, तलावांचे नुतनिकीकरण व 'यशवंत ग्राम समृद्धी योजने'खाली क्रीडांगणाचे काम झाले आहे.

📚 शिक्षण व वाचनालय

गावात अंगणवाडी व इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. तसेच ग्रामस्थांच्या ज्ञानासाठी लहानसे सार्वजनिक वाचनालय आणि उज्वल क्रिडा मंडळ व महिला मंडळ कार्यरत आहेत.

🎉 ५. गावातील सण, उत्सव व क्रीडा संस्कृती

मथाणे गावात प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने आणि गावकरी एकत्र येऊन साजरा करतात.

देवीची यात्रा व नवरात्र उत्सव

चैत्र शुद्ध त्रयोदशीला देवीची भव्य यात्रा भरते. पूर्वी नाटके व कीर्तने होत असत. नवरात्रात ९ दिवस शास्त्रोक्त होम-हवन आणि भंडारा आयोजित केला जातो.

सार्वजनिक गणेशोत्सव

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व बालगोपाळ गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी विविध सांस्कृतिक व विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेऊन बक्षिसे दिली जातात.

होळी व रंगपंचमी

पारंपरिक पद्धतीने होळी वृक्ष (खांब) मिरवणूक काढून दहन केले जाते. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव रंगात न्हाऊन निघतो.

कबड्डी, व्हॉलीबॉल व क्रिकेट

उज्वल क्रिडा मंडळाने पंचक्रोशीत कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा गाजवल्या. सध्या समुद्रकिनाऱ्यावरील क्रिकेट चषक स्पर्धा तरुणांचा मुख्य आकर्षण आहे.

🤝 ६. ग्रामस्थ, मार्गदर्शक व युवा वर्ग

मथाणे गावात ५८ शिक्षक, अनेक शासकीय अधिकारी, नौदल-लष्कर कर्मचारी आणि ५० हून अधिक बागायतदार शेतकरी आहेत. गावाला अनेक थोर व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले आहे.

🌟 गावातील मार्गदर्शक व नामांकित व्यक्ती

  • डॉ. बळवंत पाटील: वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील दीपस्तंभ.
  • कै. सखाराम रा. चौधरी: उद्योजक व समाजसेवक.
  • कै. राजा अप्पा पाटील: राजा-राणी ट्रॅव्हल्सचे संस्थापक.
  • केसरी भाऊ पाटील: केवडी व पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती.
  • बाबुराव सु. पाटील व प्रकाश विष्णू चौधरी: मंदिर जीर्णोद्धार कार्यवाहक.

💪 एकजूट व युवा शक्ती

गावातील सर्व तरुण मंडळे आणि ग्रामस्थ धार्मिक, सामाजिक व क्रीडा उपक्रमांमध्ये खांद्याला खांदा लावून एकत्र काम करतात. 'गाव हाच आमचा अभिमान' हीच प्रत्येकाची भावना आहे.

📞 संपर्क आणि स्थान (Contact Us)

📍 पत्ता (Address)

ग्रामपंचायत मथाणे
पोस्ट: एडवण, तालुका: पालघर,
जिल्हा: पालघर, महाराष्ट्र - ४०११०२

जवळचे रेल्वे स्टेशन: सफाळे (१६ किमी)

अधिकृत ईमेल:

💬 थेट संपर्क करा

गावाबद्दल अधिक माहिती, जुन्या आठवणी किंवा छायाचित्रे पाठवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.